खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा गावच्या चारही दिशेला डोंगररांगा आहेत. गावच्या पूर्वेकडील डोंगरावर २००९ पासून वनविभागाने आतापर्यंत २२ हेक्टरवर २४ हजार वृक्षलागवड केली आहे. नैसर्गिक झाडीही भरपूर आहेत. दरम्यान, वनविभागाने पाणवठे तयार केल्याने वन्यजीवांची रेलचेल वाढली आहे.
औसा तालुक्यातील खरोसा हे डोंगराळ भागातील गाव आहे. या डोंगरावरच लेण्या आहेत. त्यामुळे या भागात नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते. दरम्यान, डोंगरामुळे वनराई बहरली आहे. त्याचबरोबर वनविभागाकडून वृक्षलागवड करण्यात आली आहे. सन २००९ पासून येथील २२ हेक्टरवर वनविभागाने २४ हजार रोपांची लागवड करून जोपासना केली आहे. करंज, सीताफळ, बांबू, बदाम, सागवान, लिंब, चिंच, हेला, आवळा, कांचन, अंजन, तुती, वड, पिंपळ, उंबर, टिकुमा आणि लक्ष्मीतरू अशा विविध फळ, फुलांची आणि वनौषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.
घनदाट झाडी असल्याने वन्यजीवांचे वास्तव्य वाढले आहे. आतापर्यंत या परिसरात हरिण, मोर, ससा, मरलंगी, सायाळ, खवल्या मांजर, मुंगूस, साप आणि वानर असे वन्यजीव आढळून येत होते. दरम्यान, या वन्यजीवांची उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून वनविभागाच्या वतीने पाणवठे तयार करून त्यात टँकरद्वारे पाणी टाकण्यात आले आहे. त्यामुळे वन्यजीवांची भटकंती थांबली आहे.
दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून लांडग्याचा वावर वाढला असल्याचे वनविभागाचे नाना चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे या परिसरातील शेतकरी पशुधन चारण्यास घेऊन जाण्यास भीती व्यक्त करत आहेत.
आणखीन वृक्षलागवड...
खरोसा गावच्या पश्चिमेकडील डोंगरावर येत्या जूनपासून पाच हेक्टरवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. संपूर्ण डोंगरावर टप्प्याटप्प्याने ६४ हजार वृक्षलागवड केली जाणार आहे. त्यासाठी नर्सरीमध्ये रोपे तयार करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या डोंगराचा काही भाग रामेगाव शिवारात येत असून त्या शिवारातील भागात खड्डे खोदकाम पूर्ण झाले आहे.