जळकोट तालुक्यात मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. पिकेही चांगली उगवली होती. परंतु, गेल्या ८ ते १० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. कोवळी पिके कोमजू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. दरम्यान, चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. रिमझिम पाऊस होत आहे. रविवारी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तसेच सोमवारीही पाऊस झाला आहे.
आतापर्यंत जळकोट महसूल मंडळात ३९० मिमी, घोणसी मंडळात १८७ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. सततच्या पावसामुळे नदी- नाल्यास पाणी वाहू लागले आहे. तसेच माळहिप्परगा, रावणकोळा, हळद वाढवणा, जंगमवाडी, शिंदगी, शेलदरा, वांजरवाडा, डोणगाव, जगळपूर, डोंगरगाव, डोंगरकोनाळी, करंजी, सोनवळा, ढोरसांगवी, चेरा, गुत्ती येथील साठवण तलावातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. १५ दिवसांनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.