लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वॉकिंग ट्रॅकसह विविध मैदाने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरच्या घरीच व्यायामाला पसंती दिली आहे. योग आणि प्राणायामाच्या जोरावर घरच्या घरीच व्यायाम करत नागरिक ऑक्सिजनची पातळी सुस्थितीत ठेवत फुफ्फुसाची कार्यक्षमता मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे कोरोनावर ‘प्राणायाम’चा डोस गुणकारी ठरत आहे.
प्राचीन काळापासून योग-प्राणायामचे महत्त्व आहे. घरच्याघरीच हा व्यायाम प्रकार करता येत असल्याने याचे महत्त्व वाढले आहे. कोरोनाच्या काळात तर आजारी नागरिकांसह तंदुरुस्त व्यक्तीही प्राणायामचा आधार घेत आहेत. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढविण्यासह ऑक्सिजनची पातळी समतोल ठेवण्यासाठी प्राणायामाचे महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक घराघरात सध्या लहान मुलांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्राणायाम नित्यनियमाचे झाले आहे. याचे परिणामकारक फायदे असल्याने घरोघरी योगा-प्राणायाम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या संचारबंदी असल्याने अनेकांनी घरच्याघरीच ऑनलाईन पद्धतीने योगा-प्राणायाम करण्याला पसंती दिल्याचे चित्र आहे.
प्राणायाम-योगा करण्याचे फायदे...
१. फुफ्फुसाच्या कार्यक्षमता वाढीसह प्रतिकारशक्ती विकसित होऊन जैविक शक्तीचा विकास होतो.
२. ऑक्सिजनची पातळी प्राणायाम-योगामुळे लवकरात लवकर वाढण्यास मदत होते. भ्रामरी, कपालभाती, अनुलोम, विलोम यामुळे शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.
३.आजारपण किंवा इतर वेळेतही योग-प्राणायाम केल्यास शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. अनेक आजारांवर प्राणायामचा उपचार लाभदायी आहे. यासह मनोबल वाढ, मानसिक स्वास्थ निरोगी ठेवण्यासाठीही मदत होते.
प्राणायाम तज्ज्ञ म्हणतात...
प्राणायामामुळे शरिरातील पेशी व्यवस्थित काम करतात. कपालभातीमुळे शरिरातील मल बाहेर पडते. भ्रामरीमुळे हॅप्पी हार्मोन्स तयार होतात. त्यामुळे प्राणायाम महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या काळात तर फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी हे व्यायाम प्रकार महत्त्वाचे आहेत. यामुळे फुफ्फुसातील फेप्रोईड वाढत नाही. - श्रुतीकांत ठाकूर, प्राणायाम मार्गदर्शक
कोरोनाच्या महामारीत प्राणायाम महत्त्वाचा आहे. दीर्घ श्वासाचे प्रयोग यातून होत असल्याने अनेक आजारांतून सुटका होते. शरिराचा संपूर्ण विकास प्राणायाममुळे होतो. नियमित प्राणायाम करून सातत्य राखल्यास ऑक्सिजनची मात्रा कमी होत नाही. यासह फुफ्फुसही निरोगी राहते. यासोबत सकारात्मक भावना वाढून मानसिक मनोबल मिळते. - दीपक गटागट, प्राणायाम मार्गदर्शक
नियमित योगा करणारे म्हणतात...
मी गेल्या अनेक वर्षांपासून प्राणायाम करतो. मला मधुमेहाचा त्रास असला, तरी प्राणायाममुळे त्यावर मात केली आहे. कोरोनाच्या काळात घरातील सदस्य पॉझिटिव्ह आले होते. त्यांनाही प्राणायामाचे महत्त्व सांगून यावर मात केली आहे. प्रत्येकाने योगा-प्राणायाम करून शरीर निरोगी ठेवावे. - प्रशांत कुलकर्णी
गेल्या २० वर्षांपासून मी व माझे कुटंब नियमित प्राणायाम करताे. कोरोनाच्या काळात झालेल्या संसर्गाला प्राणायाममुळे रोखता आले. प्राणायाममुळे दिवसभर मन प्रसन्न राहते. मानसिक आधारही वाढतो. श्वसन समस्या कमी होऊन फुफ्फुसाच्या स्वास्थ्यासाठी प्राणायाम महत्त्वाचा आहे. सध्या प्रत्येकाने योगा-प्राणायाम करणे आवश्यक आहे. - व्यंकट पाटील