चाकूर पंचायत समितीत एकूण दहा सदस्य संख्या आहे. त्यापैकी आठ सदस्य भाजपाचे आहेत, तर दोन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. पहिल्या टर्ममध्ये सभापतिपदी सुनीता डावरे तर उपसभापतिपदी वसंतराव डिगोळे यांची वर्णी लागली होती. गतवर्षी निवडीत भाजपा सदस्यामध्ये नाराजी निर्माण झाली होती. सभापती, उपसभापती हे पंचायत समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. विकास कामात अडथळा निर्माण करतात, असा ठपका या ठरावात ठेवण्यात आला आहे. सोमवारी भाजपाचे सदस्य महेश वत्ते, सरिता मठपती, सुनीता डावरे, विद्या शिंदे, उमादेवी राजमाने, वसंतराव डिगोळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सभापती जमुनाबाई बडे, उपसभापती सज्जनकुमार लोणाळे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांची भूमिका निर्णायक राहणार आहे. दहा सदस्यांपैकी सहा सदस्यांनी अविश्वासदर्शक ठराव दाखल केला आहे. सभापती बडे आणि उपसभापती लोणाळे यांच्याविरुद्ध सभागृहात सात सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्यास हा अविश्वासदर्शक ठराव मंजूर होतो. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मताची आवश्यकता आहे.
चाकूर येथील सभापती, उपसभापतीविराेधात अविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST