निटूर : रेशनचे धान्य घेण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांकडील मशीनवर अंगठ्याचे ठसे देणे बंधनकारक केले आहे. मात्र, निलंगा तालुक्यातील निटूर परिसरातील रेशन दुकानदारांकडील मशीनची रेंज गूल झाल्याने आठवडाभरापासून धान्य वितरण रखडले आहे. परिणामी, दुकानदारांसह लाभार्थ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखावा तसेच संबंधित लाभार्थ्यास वेळेत आणि योग्य दराने धान्य मिळावे म्हणून शासनाकडून नवनवीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गतच काही वर्षांपासून रेशनच्या लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतेवेळी आपल्या अंगठ्याचे ठसे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या पध्दतीमुळे लाभार्थ्यांना काही प्रमाणात दिलासाही मिळाला आणि एकाच्या नावावर दुसऱ्याला धान्य विक्री होण्याचे प्रकारही बंद झाले. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे.
निलंगा तालुक्यात एकूण १८९ रेशन दुकानदार आहेत. निटूरसह खडक उमरगा, बसपूर, शेंद, ताजपूर, मसलगा, आंबेगाव आदी ठिकाणच्या स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाकडून अंत्योदय, अन्नसुरक्षा, शेतकरी एपीएलच्या लाभार्थ्यांसाठी गहु, तांदुळ, साखर हे धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु, लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे घेण्यास अडचण निर्माण झाली आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या मशीनची रेंज गूल झाली असल्याने लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे घेता येत नाहीत. परिणामी, सदरील लाभार्थ्यांना धान्य वितरण करता येत नाही. गत आठवडाभरापासून ही समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, लाभार्थी सातत्याने रेशन दुकानवर हेलपाटे मारत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. लाभार्थ्यांचे सततचे हेलपाटे पाहून दुकानदारही त्रस्त झाले आहेत. सदरील मशीनची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
अभियंत्यांकडे चौकशी करा...
सदरील समस्या नायब तहसीलदार अरुण महापुरे यांच्यापुढे रेशन दुकानदारांनी मांडली असता त्यांनी मशीन दुरुस्ती करणाऱ्या अभियंत्याकडे चौकशी करावी. त्यांना यासंदर्भात अधिक माहिती आहे, असे नायब तहसीलदार महापुरे म्हणाले.
दुकानदारांना सूचना केल्या...
सध्या सदरील मशीनच्या रेंजची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या कंपनीच्या मोबाइलची रेंज (हाॅटस्पाॅट) जोडून धान्य वितरण करण्यास रेशन दुकानदारांना सांगितले आहे. लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असे अभियंता संतोष येरोळकर, योगेश सिंदाळकर यांनी सांगितले.