वीज गुल झाल्याने नागरिकांची गैरसोय
लातूर : शहरानजीक असलेल्या हरंगूळ नवीन वसाहतीमध्ये सोमवारी रात्रीपासून वीज गुल आहे. मंगळवारी दुपारपर्यंत वीज न आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. वादळी वारा आणि पाऊस झाल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. या परिसरात विजेचा पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात जलदिन उत्साहात साजरा
लातूर : जिल्ह्यात जागतिक जलदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने जलदिनाचे औचित्य साधून पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी विविध भागात येळण्या बसविण्यात आल्या. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
वीजबिल वसुलीसाठी महावितरणची मोहीम
लातूर : जिल्ह्यात वीजबिल वसुलीसाठी महावितरणच्या वतीने मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात जवळपास १ लाख २५ हजार कृषिपंप धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. यासाठी कृषी ऊर्जा पर्व या योजनेंतर्गत थकीत वीजबिलासाठी सवलत दिली जात आहे. महावितरणने वीजपुरवठा खंडित न करता बिल भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. तर शेतकऱ्यांनी थकीत बिलाचा तत्काळ भरणा करण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आरोग्य विभागाच्या वतीने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तिंचा शोध घेऊन अँटिजेन चाचणी केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बाधित रुग्णांचा आलेख वाढत आहे. यामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांना होमआयसोलेशनचा पर्याय देण्यात आला असल्याने बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. प्रत्येकाने मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांचा काटेकोरपणे अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.