चापोली : सोशल मीडियाच्या काळातही टपालाद्वारे सुख-दुःखाचा निरोप घरपोच पोहोचविण्याचे कार्य पोस्टमन करीत आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळातही हे काम अविरत सुरू आहे. चापोली पोष्टाअंतर्गत दीड महिन्यात ३ हजार टपालांचे वितरण करण्यात आले आहे.
डाक विभागाची सेवा अत्यावश्यक सेवेत आहे. नातेवाइकांनी आपल्या दुसऱ्या नातेवाइकांना टपालाद्वारे पाठविलेले निरोप पोस्टमन पायाच्या टाचा झिजवित कोरोनाच्या संकटातही सुरूच आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरू आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत टपाल कर्मचारी एकही पत्र अथवा इतर टपाल गहाळ न करता नागरिकांच्या दारापर्यंत पोहोच करीत आहेत.
चापोली पोस्ट कार्यालयाअंतर्गत एक पोस्टमन, एक पोस्ट मास्तर तसेच हिप्पळनेर व उमरगा कोर्ट येथे प्रत्येकी एक एबीएम असे ४ कर्मचारी आहेत. नागरिकांना त्यांचे महत्त्वाचे टपाल, रजिस्टर स्पीड पोस्ट, पार्सल वितरण, ज्येष्ठांचे पेन्शन घरपोच देणे, सरकारच्या विविध योजनांचे पैसे नागरिकांना घरपोच देणे तसेच औषधींही घरपोच देण्याचे काम संकटकाळातही पोस्टमन करीत आहेत.
चेहऱ्यास मास्क लावून सकाळी पोस्ट कार्यालयात आलेला पोस्टमन प्रथम सॅनिटायझर करतात. मग पोस्टात आलेल्या टपालांची क्रमवारी करण्यासाठी बीटनिहाय त्यांचे वेगवेगळे गट तयार करतात. त्यानंतर संगणकीय नोंदणी करून बीटनुसार वितरणासाठी तयार होतात. सध्या कोरोनाच्या संकटात पोस्टाकडून विंडो डिलेव्हरी सेवा सुरू आहे. आपल्या पिशवीत सॅनिटायझर बाटली ठेऊन पोस्टमन घरोघरी जाऊन टपाल वाटप करीत आहेत.
तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा...
गत दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, टपाल कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहे. चाकूर तालुक्यात ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते ठणठणीत बरे होऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
निष्ठेने कर्तव्य सुरू...
दीड वर्षापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यात प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. कोरोनामुळे मनात भीती होती. सुरुवातीचे आणि आताचे दिवस भीतीदायक वातावरण आहेत. पण, कर्तव्य तर पार पाडावेच लागणार. कुटुंबातील सदस्यांनाही नेहमी काळजी रहायची. पण, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले.
- बालाजी होनराव, पोस्ट मास्टर, चापोली.
विविध प्रश्न भेडसावयाचे...
कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना पत्र देणे हे खरोखरच खूप कठीण होते. लोक काय म्हणतील, आपल्यावर दारात उभे करतील की नाही, ही भीती सतत मनात राहत होती; पण कोरोनाच्या संकटातही आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे.
- सुखदेव जाधव, पोस्टमन