शेतकऱ्यांचा सोयाबीनवर अधिक कल आहे. दर्जेदार सोयाबीन मिळविण्यासाठी शेतकरी आतापासूनच चौकशी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.
यंदा वेळेवर मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी शेती मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी सज्ज होत आहेत. हंगाम सुरू होण्यास केवळ १० ते १२ दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. चापोलीसह परिसरातील शेतकरी चाकूर, शिरूर ताजबंद, अहमदपूरच्या कृषी सेवा केंद्रावर बी- बियाणे व खते खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. साधारणपणे चांगले सोयाबीन बियाणे मिळावे म्हणून शेतकरी प्रयत्नशील आहेत. परंतु, यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित बियाणांसाठी शोध घ्यावा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.
यावर्षी चापोलीसह परिसरात १ हजार ४१२ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज कृषी विभागाने दिला आहे. मात्र, बियाणांची टंचाई लक्षात घेता एवढ्या हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चापोली परिसरात सोयाबीन, तूर, कापूस ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. ही तिन्ही पिके नगदी पीक म्हणून ओळखली जातात. यावर्षी सोयाबीन दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल वाढला आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, मूग, उडीद, बाजरी या पिकांच्या क्षेत्रातही वाढ हाेणे अपेक्षित आहे.
उगवणक्षमता चाचणी...
शेतकऱ्यांना अपेक्षित सोयाबीन बियाणे मिळणे कठीण आहे. त्यात यंदा सोयाबीन बॅगच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी, चापोली परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी गतवर्षी खरीपात उत्पादन घेतलेल्या सोयाबीनपासून बियाणे तयार करण्यास पसंती दिली आहे. चाकूर कृषी विभागातर्फे येथील कृषी सहायक पी.बी. गिरी या सोयाबीन बियाणे उगवणक्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक गावांमध्ये दाखवित आहेत.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन...
गेल्या वर्षी सोयाबीन उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या हंगामात गावागावात जाऊन घरचे बियाणे पेरणी करण्यासाठी व बीज प्रक्रिया करण्याबाबत बियाणे उगवणक्षमता प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे कृषी सहायक पी.बी. गिरी यांनी सांगितले.