केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत देशात २२ वा क्रमांक नितीन पांचाळ याने मिळविला आहे. तो जळकोट तालुक्यातील सोनवळा येथील रहिवाशी आहे. त्याचे वडील जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक आहेत. नितीनचे प्राथमिक शिक्षण कुंभार पिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. ६ वी ते १०वीपर्यंतचे शिक्षण जालना जिल्ह्यातील परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण लातुरातील सोनवणे महाविद्यालयात झाले.
१२ वीनंतर त्याने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन ही पदवी विशेष प्राविण्यासह मिळविली. पुण्यात शिक्षण घेताना कॅम्पस इंटव्यूहमधून त्याला खासगी नोकरीची संधी मिळाली. तिथे त्याने दोन वर्षे सेवा केली. मात्र, शासकीय सेवेत जाण्याची इच्छा असल्याने त्याने २०१८ पासून अभ्यास करण्यास सुरुवात केली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत त्याने मजल मारली. परंतु, त्यात यश आले नाही. अपयशाला न डगमगता पुन्हा नव्या उमेदीने तयारीला सुरुवात केली. दुसऱ्या प्रयत्नामध्ये २०२०च्या परीक्षेत देशात २२व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो आहे.
भविष्याचा विचार न करता अभ्यास...
नितीन पांचाळ म्हणाला, मला यूपीएसस्सी उत्तीर्ण व्हायचे आहे, हे निश्चित ठरवून भविष्याचा विचार न करता अभ्यास करीत राहिलो. स्वतःला शिस्त लावून घेतली. दोन वर्षे सतत अभ्यास केला. दरम्यान, कोरोनाचे संकट आले. त्यामुळे परीक्षा होणार का, वर्ष वाया जाणार का, अशा अनेक प्रश्नांचे युवकांच्या मनात काहूर होते. मात्र, मी सतत अभ्यास करीत राहिलो. त्यामुळेच हे यश मिळाले आहे.
मित्रांनो, आपला उमेदीतील जास्तीतजास्त वेळ राजकारण, सोशल मीडियावर न घालविता स्वतःला घडविण्यासाठी लावावा. आई-वडिलांच्या कष्टाची आठवून अभ्यास करावा. जिद्द व चिकाटीच्या जोरावर निश्चित यश मिळते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा महिन्यावर आली असताना, आजोबा आजारी पडले. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. पाहुण्यांची घरी रेलचेल चालूच होती. त्यानंतर, मोठ्या भावाचा विवाह जुळला. अशा परिस्थितीतही मी अभ्यास करीत राहिलो, असे नितीन पांचाळने सांगितले.