टंचाई निवारणासाठी कृती आराखडा
लातूर : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत नवीन विंधन विहीर घेणे, विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, गाळ काढणे, प्रगतिपथावरील नळयोजनेची दुरुस्ती करणे, नवीन नळ योजना राबविणे आदी उपाययोजना राबविल्या जाणार आहे. ज्या गावात पाणीटंचाई आहे त्या ग्रामपंचायतीला पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर करावे लागणार असल्याचे टंचाई निवारण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
जेवळी रस्त्याची दुरवस्था ; वाहनधारक त्रस्त
लातूर : तालुक्यातील जेवळी ते लातूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांच्या वतीने संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
नवीन बांधकामांना आला वेग
लातूर : शहरासह नजीकच्या वसाहतीमध्ये नवीन बांधकामांना वेग आला आहे. हरंगूळ नाविम वसाहत परिसरात जलस्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने बांधकामे वेगात सुरू आहेत. लॉकडाऊनपासून अनेकांनी आपल्या प्लॉटवर बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे.
मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले
लातूर : शहरातील खाडगाव रोड परिसरात मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. अनेकजण घंटागाडी नियमित येत नसल्याने रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकत आहे. याकडे शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देऊन, नियमित घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
बंद असलेले सिग्नल सुरू करण्याची मागणी
लातूर : शहरातील काही चौकातील सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या लातूर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने अनेकजण सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडतात. मात्र, सिग्नल वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहर वाहतूक शाखेने बंद असलेले सिग्नल तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.