उदगीर- निलंगा हा राज्यमार्ग देवणी तालुक्यातून जातो. तालुक्यातून जाणारा हा एकच राज्यमार्ग आहे. या मार्गासाठी खोदकाम करण्यात आले आहे. काही ठिकाणी मजबुतीकरणाचे कामही झाले आहे; परंतु, अचानकपणे काम बंद ठेवण्यात आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. परिणामी, या रस्त्यावर चिखल होत आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे कठीण झाले आहे शिवाय, पादचाऱ्यांना ये-जा करताही येत नाही.
हा मार्ग धनेगाव, वलांडी, अचवला, विळेगावातून आणि देवणी शहरातून जातो. मात्र, सध्या वाहनधारकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित होणे गरजेचे आहे. ही कामे तत्काळ करण्यात यावीत, अशी मागणी देवणी तालुका भाजपच्यावतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष काशीनाथ गरिबे, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पटणे, दिलीप मजगे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ आष्टुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बालाजी बिरादार, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे, पं. स. सदस्य सोमनाथ बोरोळे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, ओम धनुरे, अंबादास पाटील, मयूर पटणे, ईश्वर पाटील आदी उपस्थित होते.