महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत उदगीर येथे दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय २००७च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरीने सुरू करण्यात आले. सन २००९च्या शासन निर्णयानुसार दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय सुरू करण्यासाठी स्वतंत्र मुलभूत सुविधा उपलब्ध होईपर्यंत, हे महाविद्यालय पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील इमारतीमध्ये सुरू करण्यात यावे, तसेच दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय (वरुड) पुसद, जि.यवतमाळ येथील शिक्षक व शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून घ्याव्यात, याबाबत विद्यापीठाने कार्यपद्धती अनुसरून कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली. त्यानुसार, महाविद्यालय, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या अस्थायी बांधकामात २००८ पासून आजतागायत सुरू आहे. सन २०१४च्या शासन निर्णयानुसार दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीरसाठी प्रशासकीय इमारत, वर्ग खोल्या, सभागृह, सेमिनार हॉल, ग्रंथालय, क्रीडा मैदान, रासेयो वसतिगृह, उपहारगृह, अतिथीगृह, कर्मचारी निवासस्थाने, विद्यार्थी डेअरी प्लाॅन्ट, तसेच परिसर विकास आदीसह प्रस्तावित बांधकामे पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याकरिता रुपये ३७६०.०३ लक्ष इतक्या रकमेस प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली.
महाविद्यालयाने अतिशय कमी वेळेत शिक्षण व विस्तार कार्यात भरीव कामगिरी केली आहे. भारतीय कृषि परिषद, नवी दिल्लीद्वारे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. तसेच शेतकरी, बेरोजगार, महिला बचत गटांसाठी विविध प्रशिक्षण, फिरते प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे महाविद्यालयाद्वारे आयोजन केले जाते. याद्वारे या भागातील दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे.
परंतु महाविद्यालयाकरीता स्थायी इमारत नसल्यामुळे व अपुऱ्या जागेत महाविद्यालय कार्यरत असल्यामुळे शिक्षण, विस्तार व संशोधन कार्य प्रभावीपणे करण्यास अनेक अडचणी येत आहेत. महाविद्यालयाचे व पर्यायाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आर्थिक वर्ष २०२०-२१ पर्यंत एकूण रू. ७५२७.०० लाख अनुदान प्राप्त होणे प्रस्तावित आहे. शासन निर्णयातील मंजुरीनुसार अनुदान वितरित करण्याबाबत प्रस्ताव शासनास विद्यापीठ स्तरावरून सादर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयास एकूण ३७ पदे (शिक्षकवर्गीय-१८ व शिक्षकेतर-१९) मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी केवळ ७ शिक्षकवर्गीय व २ शिक्षकेत्तर पदे भरण्यात आले आहेत. महाविद्यालयाचे व पर्यायाने विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन रिक्त असलेली पदे तातडीने भरणे गरजेचे आहे, अशी मागणी दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमण संभाजीराव काकरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.