शिरूर ताजबंद : बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाव्दारा संचलित मोहनराव पाटील आयुर्वेदिक मेडिकल ॲण्ड चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे मोहनराव पाटील कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरचे लोकार्पण सोमवारी माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बाधित रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी पुढाकार घेऊन या सेंटरची उभारणी केली आहे. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे, जिल्हा परिषदेचे गटनेते मंचकराव पाटील, पंचायत समिती सदस्य सुशिला भातिकरे, प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, प्राचार्य डॉ. वि. ना. कांबळे, निवृत्ती कांबळे, आदी उपस्थित होते.
येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध असून, रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची सहा पथके कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना आधार...
आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, शिरुर ताजबंद हे चौरस्त्यावरील गाव आहे. त्यामुळे कोविड रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी, म्हणून हे सेंटर सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची सोय होणार आहे. येथे तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.