सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आढळून येणाऱ्यांना उपचार देण्यासह त्यांची देखभालही केली जाते. चाकूर तालुक्यात एका वर्षात ४०० ते ५०० रुग्ण समोर येत होते. २०१८ या वर्षात १२६, २०१९ मध्ये १३९ तर २०२० या वर्षात ९३ क्षयरुग्ण आढळले आहेत. १ जानेवारी ते २५ मे २०२१ या कालावधीत केलेल्या चाचण्यांनुसार २७ जणांना क्षयरोगाची लागण झाली आहे. २०१८ पासून रुग्णांना वेळेवर दिल्या जाणाऱ्या औषधी आणि योग्य उपचार यामुळे रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याची माहिती चाकूर क्षयरोग विभागाकडून देण्यात आली. मास्कमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी झाला असताना क्षयरोगाचा मृत्यूदरही कमी झाला असून, १ जानेवारी ते २५ मे २०२१ या कालावधीत क्षयरोगाने मृत्यू झाल्याची संख्या ही निरंक असल्याचे सांगण्यात आले.
रुग्ण कळविल्यास प्रोत्साहनपर अनुदान...
खासगी वैद्यकीय डॉक्टरांकडे क्षयरोगाचे जास्त प्रमाणात निदान होते. त्यामुळे क्षय रोगाचे निर्मूलन करण्यासाठी जर सरकारी आरोग्य यंत्रणेकडे कळविल्यास त्यांना ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद आहे - कोट -जी.डी. ओपळकर, क्षयरोग तालुका पर्यवेक्षक, चाकूर.
मास्कचा वापर वाढल्याने रुग्ण संख्येत घट...
कोरोना हा आजार श्वसनाचा आजार आहे. त्याचा विषाणू हा खोकलल्यास किंवा शिंकल्यास पसरून संसर्ग होतो. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर पूर्वीपासून केला जातो. गत दीड वर्षांपासून कोविडमुळे नागरिकांमध्ये मास्कचा वापर वाढल्याने क्षयरोगाच्या संसर्गाचा धोकाही कमी झाला आहे.