लातूर : शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली. या अंतर्गत जिल्ह्यात ५६ हजार ९४६ शेतकऱ्यांना ३३५ कोटी ४० लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. परंतु, यातील बहुतांश शेतकरी योजनेचा लाभ मिळूनही पीक कर्जापासून वंचित आहेत.
कर्ज पुरवठा करण्याचे आदेश असतानाही राष्ट्रीयीकृत बँकांच्या उदासिनतेमुळे अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. अनेकांचे बँक व्यवहार नियमित असतानाही कर्ज मिळाले नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. जिल्ह्यात केवळ ५२ टक्क्यांपर्यंत कर्ज वाटप होत असल्याचे चित्र आहे.
कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला. मात्र नवीन पीक कर्ज काही मिळाले नाही. खरीप गेला, आता रबी आला. बँकांच्या उदासीनतेमुळे कर्ज मिळत नाही.
- शेतकरी
कर्जमाफी झाल्यानंतर बँकेकडून बेबाकी घेतली. लगेच नवीन कर्जासाठी प्रस्ताव सादर केला. कागदपत्र पूर्ण असल्याने कर्ज मंजूर झाले.
- शेतकरी
कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज पुरवठा करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार अनेकांना पीक कर्ज उपलब्ध झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही, त्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यानुसार संबंधित बँकांना सूचना केल्या जात आहेत. उद्दिष्टपूर्ती करण्यासाठीही बँकांना वेळोवेळी सूचना केल्या जातात.
- समृत जाधव,
जिल्हा उपनिबंधक, लातूर