उदगीर : केंद्र सरकारने डाळीच्या किमती वाढत असल्याचे सांगत व्यापाऱ्यांना साठा मर्यादेचे निर्बंध लागू केले आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातील बाजार समितीअंतर्गत व्यवहार करणाऱ्या कडधान्य व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी बंद केली होती. दरम्यान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शासन निर्णय मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याने अखेर व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला. त्यामुळे दहा दिवसांपासून बंद असलेला आडत बाजार बुधवारी सुरू झाला.
केंद्र सरकारने २ जुलैपासून व्यापाऱ्यांना शेतीमालाच्या कडधान्य साठवणुकीवर मर्यादा आणली आहे. कडधान्याची सर्वांत मोठी उलाढाल मराठवाड्यात लातूरनंतर उदगिरात होते. कच्च्या शेतमालाच्या उपलब्धतेमुळे उदगीर परिसरात ४० पेक्षा जास्त डाळीचे कारखाने आहेत. येथून देशाच्या कानाकोपऱ्यांत डाळीची विक्री होते. परंतु, केंद्राच्या नव्या निर्णयास विरोध दर्शवित राज्यातील बाजार समित्यांतील व्यापाऱ्यांनी हा अध्यादेश त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी व्यवहार बंद ठेवले होते.
दरम्यान, मंगळवारी मुंबईत राज्यातील विविध व्यापारी संघटनाचे पदाधिकारी व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यात चर्चा झाली. अध्यादेश मागे घेणार नसल्याचे सांगितल्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद मागे घेत असल्याचे सांगितले.
दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात डाळीचे दर किरकोळ बाजारात वाढले होते. त्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त होत होता. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर व डाळीचे कारखाने सुरू झाल्यामुळे दर स्थिर आहेत. परंतु, केंद्र सरकारने २ जुलैला डाळवर्गीय धान्यात मोडणाऱ्या मूग वगळता तूर, उडीद, मसूर, हरभरा, आदी धान्याच्या साठवणुकीवर मर्यादा लागू केली आहे.
केंद्राच्या निर्णयाचा व्यापारावर परिणाम...
केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता साठा मर्यादा अध्यादेश काढला. ३० दिवसांच्या आत ज्यांच्याकडे अतिरिक्त साठा आहे, त्यांनी तो शेतमाल विक्री करावा, असे आदेश काढल्यामुळे व्यापाऱ्यांत खळबळ उडाली. या आदेशामुळे व्यापारी व शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. हा अध्यादेश मागे घ्यावा, म्हणून राज्यातील सर्व बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी खरेदी बंद ठेवली होती. दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी अध्यादेश मागे घेण्यात येणार नसल्याचे सांगितल्यामुळे व्यापारी हतबल होत बंद मागे घेतल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी काही दिवसांत उदगिरातील काही डाळीचे कारखाने शासनाच्या या निर्णयामुळे बंद पडतील, अशी भीती दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष सुदर्शन मुंडे यांनी व्यक्त केली.