लातूर : मागील आर्थिक वर्ष कोरोनात गेले आहे. अनेक व्यवसाय, व्यापारावर मंदीचे सावट आले. मात्र, मद्य विक्रीच्या व्यवसायाने अशा कठीण काळातही उच्चांक गाठला आहे. गतवर्षीच्या तुलनेत देशी दारू, बीअरच्या मागणीत मद्यपींकडून मागणी घटली असल्याचे चित्र आहे, तर वाईन आणि विदेशी मद्याला मद्यपींची पसंती आहे.
२०१९-२० या वर्षात जिल्ह्यात ७९.६३ लाख लिटर, तर २०२०-२१ या वर्षात ७५.६२ लाख लिटर देशी मद्याची विक्री झाली आहे. या मागणीत ०.०५ टक्के घट झाली आहे, तर विदेशी मद्याच्या मागणीत ०.४३ टक्के वाढ झाली आहे. यासोबतच बीअरच्या विक्रीत ०.२ टक्के घट झाली असून, वाईनच्या मागणीत ०.९ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे चित्र आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क लातूर विभागाला १० कोटी २३ लाख ५१ हजार, तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात १३ कोटी ९४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संचारबंदी लागू आहे. अनेकजण बाहेर जाण्याचे टाळत असल्याने मद्य विक्रीत काही प्रमाणात घट झाली आहे.
महसूलला दारूने दिला आधार
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना अनेक काळ बंद राहिल्याने महसुलावर परिणाम झाला होता. दरम्यान, २०१९-२० वर्षांत १० कोटी २३ लाख ५१ हजार, तर २०२०-२१ या वर्षात १३ कोटी ९४ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. विशेष म्हणजे २०२०-२१ मध्ये ०.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दोन कोटींहून अधिक दारू जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या दोन वर्षांत अवैध दारू विक्री विरोधात विशेष मोहीम राबविली आहे. त्याअनुषंगाने २०२०-२१ वर्षात ६१८ गुन्हे दाखल असून, १ कोटी ६५ लाख ९१ हजार ४७०, तर २०१९-२० या वर्षात ५७७ गुन्ह्यांत ९८ लाख ४१ हजार ४२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध विक्री विरोधात विशेष मोहीम
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैध दारू विक्री विरोधात विशेष मोहीम राबविली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशी आणि बीअर विक्रीत काही प्रमाणात घट झाली आहे. लॉकडाऊनचा परिणाम यावर झाला असल्याचे चित्र आहे.
- गणेश बारगजे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क लातूर
बीअर, देशीची मागणी घटली
जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात देशी मद्याला पसंती होती. मात्र, यामध्ये घट झाली आहे. सोबतच बीअरमध्येही ०.२ टक्के मागणी घटल्याचे चित्र आहे. शहरात ऑनलाईन विक्री सुरू असली तरी ग्रामीण भागात ही सुविधा नाही. परिणामी, बीअर, देशीला मागणी घटली आहे.