जिल्ह्यात जवळपास २ हजार २०० अंध व्यक्तींची नोंदणी आहे. अनेकजण उद्योग, व्यवसाय करीत आपली उपजीविका भागवितात. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे अनेक व्यवसाय संकटात आले आहेत. परिणामी, अंध व्यक्तीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने इतर घटकांना मदत केली आहे. मात्र, अंध व्यक्तींना कोणत्याच प्रकारची मदत करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या या संकटकाळात काही अंध व्यक्तींना कोरोनाची लागण झाली यामध्ये यशस्वी उपचारानंतर बरेही झालेत. मात्र, लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे अंध व्यक्तींवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांना शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी होत आहे.
आधार ही एकमेकांचाच...
कोरोनाच्या संकटापूर्वी नियमित हाताला काम मिळत होते. त्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून हाताला काम नसल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने तात्काळ मदत करण्याची गरज आहे. - संदीप चोपडे, लातूर
कोरोनामुळे काम बंद आहे. हाताला काम नाही. मदत कोणाकडे मागणार. शासनाने इतर घटकांना ज्याप्रमाणे मदत केली त्याचप्रमाणे अंध व्यक्तींना मदत करण्याची गरज आहे. - मीरा चोपडे, लातूर
मी स्वत: गायक असल्याने गायनाचे कार्यक्रम करायचो. त्यातून आर्थिक उत्पन्न मिळत होते. मात्र, दीड वर्षांपासून सर्वच बाबींवर निर्बंध आले आहेत. परिणामी, गायनाचे कार्यक्रम झालेले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न आहे. - जगन्नाथ जगताप, लातूर
कोरोना काळात मदतीची अपेक्षा...
जिल्ह्यात ५ ते ७ अंध व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. यातील सर्वांनीच कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनामुळे हाताला काम नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे शासनाने अंध व्यक्तींना मदत करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांमधून होत आहे.
कोट...
शासनाने कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक घटकाला आर्थिक मदत केली आहे. मात्र, अंध बांधव मदतीपासून वंचित आहेत. संचारबंदीमुळे व्यवसायावर संकट आले आहेत. अनेक जण गायन, संगीत, तबलावादन यासारखे वर्ग घेऊन आपली उपजीविका भागवित असत. मात्र, सर्वच बाबीं बंद असल्याने आर्थिक स्त्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे शासनाने अंध बांधवांची दखल घेत त्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी जिल्ह्यातील अंध बांधवांमधून होत आहे.