कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येऊन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. रस्त्यावर नागरिकांनी विनाकारण फिरू नये, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहीही करण्यात येत होती. मात्र, बेफिकीर व्यक्तींची संख्या कमी होत नसल्याचे सोमवारी दिसून आले. त्यामुळे वलांडीतील निलंगा- उदगीर रस्त्यावर अनावश्यक घराबाहेर पडलेल्या ५८ जणांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, ग्रामविकास अधिकारी दत्ता गायकवाड, आरोग्य विभागाच्या मोना सरवदे, फौजदार डबेरवाड, राजपाल साळुंखे, देवीदास किवंडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
नियमांचे पालन करावे...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रस्त्यावर अनावश्यक आढळून आल्यास कोविड चाचणी करण्यात येईल. तसेच दंड वसूल करण्यात येईल. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार सुरेश घोळवे व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले.
वलांडी येथी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण सुरू आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांनी ही लस घ्यावी, असे आवाहन सरपंच राणीताई भंडारी यांनी केले आहे.