कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, वलांडीत काहीजण सकाळी ११ वा. नंतर विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे आढळून आले. त्यांना पायबंद घालण्यासाठी कोविड चाचणी करण्याच्या सूचना तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केल्या होत्या. त्यानुसार विनाकारण फिरणाऱ्या ६३ जणांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७३ जणांची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल लातूरहून येणार असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन हत्ते यांनी दिली.
दरम्यान, गावातील सर्व दुकानदारांनी तसेच दुकानातील नोकरांनी कोविड चाचणी करुन घ्यावी. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होईल, असे आवाहन तहसीलदार सुरेश घोळवे यांनी केले आहे. प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असेही ते म्हणाले.