अहमदपूर : लॉकडाऊन काळात घरगुती हिंसाचाराचे प्रकरणे समोर आली असून, अहमदपूर पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या महिला व बाल साहाय्यता कक्षाने मागील चार वर्षांपासून ४६१ महिलांचे संसार फुलविले आहेत, तर ४१ प्रकरणे प्रलंबित आहेत.
महिला व बाल साहाय्यता कक्ष पोलीस स्टेशन अहमदपूरअंतर्गत मागील चार वर्षांपासून ५३४ प्रकरणे दाखल झाली होती. त्यातील ४६१ प्रकरणात पती-पत्नींमध्ये तडजोड होऊन बिघडलेले संसार पुन्हा जुळवले आहेत. यामुळे अनेक दाम्पत्य सुखी जीवन जगत असून, ४१ प्रकरणे प्रलंबित आहेत. ३२ प्रकरणांत घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले आहे. यंदाही नऊ प्रकरणे समुपदेशनासाठी आली होती. होत्या ३ प्रकरणांत समुपदेशन करण्यात आले असून, सहा प्रलंबित आहेत. समुपदेशन केंद्रामुळे घटस्फोटांची संख्या कमी झाली असून, आतापर्यंत ३२ प्रकरणांत तडजोड न झाल्यामुळे घटस्फोट झाले आहेत.
चर्चा करून गैरसमज केले दूर...
या प्रकरणांत महिला व बाल समुपदेशन कक्षाच्या वतीने पीडित महिलांची तक्रार घेतली जाते. त्यानंतर त्यांचे नातेसंबंध व नातेवाईक व पतीबरोबर चर्चा केली जाते. दोघांना व दोघांच्या नातेवाइकांना एकत्र आणून चर्चा, समुपदेशन केले जाते. कौटुंबिक वाद, गैरसमज दूर केले जातात. याप्रक्रियेमध्ये अडचणी असल्यास सदर प्रकरण घरगुती हिंसाचारअंतर्गत दाखल करून पोलीस स्टेशकडे वर्ग करण्यात येते.
सात महिलांची दक्षता कमिटी...
महिला दक्षता समिती, महिला समुपदेशन केंद्र सात महिलांची दक्षता कमिटी आहे. त्यात शहरातील डॉक्टर्स, वकील, सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सर्वप्रथम महिलांचे समुपदेशन करण्यात येते. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ होते. महिला समुपदेशन केंद्र शून्य ते वयोवृद्ध महिलांच्या तक्रारीविषयी सजग असून, कोणत्याही महिलेची कौटुंबिक तक्रार असेल तर समुपदेशन केंद्राशी संपर्क साधावा. - दीपक सगर, समुपदेशक