जळकोट तालुक्यात आतापर्यंत १ हजार ६५७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी १ हजार ५९४ जण उपचारानंतर ठणठणीत झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ४१ जण दगावले आहेत. सध्या तालुक्यात २२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. होम आयसोलेशनमध्ये आठजण आहेत. ११ गंभीर रुग्णांना उदगीर, लातूरला रेफर करण्यात आले आहे. शहरात नऊ ॲक्टिव्ह, तर ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी दिली.
तालुक्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरली होती. तालुक्यातील एकुरका, धामणगाव, सिंदगी, वांजरवाडा, लाळी खु. व जळकोट शहरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण होते. त्यामुळे आरोग्य विभागाने काही गावे सील करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या होत्या. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनासोबत घेऊन वारंवार बैठका लावून निर्देश दिले होते.
अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्याने कोरोनाचा आलेख कमी झाला आहे.
नियमांचे पालन करावे...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा. शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी केले आहे.