लातूर : कोरोनाने जिल्ह्यात २ हजार २९७ व्यक्तींचा बळी घेतला आहे. यातील १ हजार ९४६ मयतांवर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले असून, यासाठी मनपाला ५४ लाख ८२ हजारांचा खर्च आला आहे. पहिल्या लाटेत ५५४ आणि दुसऱ्या लाटेत १ हजार ३९२ मयत व्यक्तींवर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.
विविध जाती धर्माच्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. १ जानेवारी ते ३१ मे या कालवधीत ९८४ पार्थिवाचे दहन करण्यात आले. तर १५६ जणांचा दफनविधी करण्यात आला. तर २८८ मृतदेह नातेवाईकांकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात झालेल्या सर्वच मयतांवर महानगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
महानगरपालिकेच्या आठ कर्मचाऱ्यांची टीम यासाठी कार्यरत आहे. १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत कोरोनाचा प्रकोप होता. याच कालावधीत सर्वाधिक मृत्यू झाले असून, यातील बहुतांश मयतांवर महानगरपालिकेच्या या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १९ लाख ५ हजार तर दुसऱ्या टप्प्यात ३५ लाख ७७ हजार असा खर्च मनपाला झाला असून, दोन्ही लाटेत एकूण ५४ लाख ८२ हजार रुपयांचा खर्च मनपाने केला आहे. मनपाच्या स्वनिधीतून हा खर्च करण्यात आला असून, शासनाकडे खर्च मिळावा म्हणून मागणी करण्यात आली असल्याचे समजते.