लातूर : शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, बेडची कमतरता जाणवत होती. त्यामुळे नेत्र विभागातील बेड अधिग्रहित करण्यात आले आहेत. परिणामी, गेल्या महिनाभरापासून शासकीय वैद्यकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील नेत्र शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील नेत्र विभागात कोरोनापूर्वी दररोज दहा ते बारा शस्त्रक्रिया होत असत, तर वर्षाला २,७०० हून अधिक शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णांचा अल्प प्रतिसाद दिसू लागला. परिणामी, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नेत्र विभागातील बेडही कोरोनासाठी आरक्षित करण्यात आले. त्यामुळे नेत्र शस्त्रक्रिया महिनाभरापासून बंदच आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक शासकीय रुग्णालयाला अधिक पसंती देतात. या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना आधार मिळतो. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेली ही सुविधा बंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच नियमित शस्त्रक्रिया सुरू होतील, असे वैद्यकीय विज्ञान संस्थेतील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोनापूर्वी दररोज दहा ते बारा जणांच्या नेत्र शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. सध्या शस्त्रक्रिया बंद आहेत.
कोरोनामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे घरीच आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होत असल्याने, शासकीय रुग्णालयातच जाणार आहे.
- अण्णासाहेब महामुनी
तीन महिन्यांपूर्वी तपासणी केली होती. डाॅक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता. मात्र, नेत्र विभागाची शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यामुळे वाट पाहावी लागत आहे.
- ज्ञानदेव शिंदे
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, नेत्र विभागातील बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. आदेश प्राप्त होताच नेत्र रुग्णालयातील शस्त्रक्रिया सुरू करण्यात येतील.
- डाॅ.उदय मोहिते, नेत्र विभाग प्रमुख, शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था