सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असे वाटत असले, तरी तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्क वापरणे अनिवार्य आहे. फिजिकल डिस्टन्स राखावा. प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे सांगून माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, १८ वर्षांपुढील सर्वांनी लस घेणे गरजेचे आहे. घरातील ज्येष्ठांचे शंभर टक्के लसीकरण करून घेणे ही कुटुंबाची जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. यापुढील काळात विद्यार्थ्यांचेही लसीकरण करून लवकर शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी आपण राज्य सरकार व केंद्र शासनाकडे करणार आहोत. सध्या पेरणीचे दिवस आहेत. सर्वांना बी-बियाणे व खते उपलब्ध व्हावीत म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नये. ज्यादा दराने खत व बियाणे विक्री होत असल्यास कृषी विभागात संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.
युवकांनी निर्व्यसनी राहावे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाकडे डोळसपणे पहावे. यथावकाश शाळा- महाविद्यालये सुरु होतील. याबाबत पालक व विद्यार्थ्यांनी निश्चिंत असावे. कोरोनाच्या संकटामुळे माझा वाढदिवस साजरा करू नये, असे मी आवाहन केले होते. त्यास नागरिकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.