लातूर: कोविड-१९ च्या अभूतपूर्व महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या शून्य ते १८ वयोगटातील बालकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे राहिले असून जिल्ह्यात गृहभेटी देऊन महामारीत पालक हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यात आला आहे. यात २०६ मुलांचे पालक मयत झाल्याचे निदर्शनास आले आहे. या बालकांना न्याय व कायदेशीर हक्क मिळवून दिले जाणार असून त्यांचे विविध योजनेतून संगोपन केले जात आहे.
२०६ पैकी ४ बालकांचे आई-वडील या महामारीत मयत झाले आहेत. तर २०२ बालकांच्या आई-वडील यापैकी एकाचे निधन झाले आहे. छत्र हरवल्याने बालकांच्या संगोपनाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५७ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मंजूर झाला असून, १५१ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. आई-वडील दोन्ही गमावलेल्या जिल्ह्यातील चार बालकांना महिला व बाल विकास विभागाच्या निर्णयानुसार पाच लाखांची मुदत ठेव करण्याची कार्यवाही टास्क फोर्स मार्फत सुरू झाली आहे.
विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत मदत....
कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेष अर्थसाह्य कार्यक्रमांतर्गत गृहभेटी करण्यात आल्या असून, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य वेतन योजनेअंतर्गत २८३ अर्ज घेण्यात आले. यापैकी १४९ अर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यांनाही या योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
शासनाच्या या संस्थांकडून होणार संगोपन...
कोविड साथीच्या प्रादुर्भावामुळे मयत व्यक्तीच्या कुटुंबाला विशेष अर्थसहाय्य आणि पालक हरवलेल्या बालकांचे संगोपन करण्यासाठी शासनाच्या या संस्थांकडून मदत केली जात आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतून मयत व्यक्तीच्या कुटुंबाला मदत केली जात आहे. तर पालक हरवलेल्या बालकांना बाल संगोपन योजना, शिशू गृह योजना, बालगृह योजना, शुभमंगल योजना आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून संगोपन केले जाणार आहे. दरम्यान जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या सर्व यंत्रणांची बैठक घेऊन तत्काळ संगोपन संदर्भात तसेच मयत व्यक्तीच्या कुटुंबाला मदत करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.