लातूर : काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाभरात इंधन दरवाढीविरोधात निदर्शने करण्यात आली. केंद्र शासनाच्या धोरणाचा काँग्रेसकडून निषेध करत इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली. लातूर शहरामध्ये उषाकिरण पेट्रोल पंपासमोर निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील लातूर, उदगीर, निलंगा, औसा, अहमदपूर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी या दहाही तालुक्यांमध्ये काँग्रेस पक्षाकडून पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या हातात ‘लुटेरे मोदी सरकार, पेट्रोल हुआ शंभरके पार, बहोत हुई महंगाई की मार, अब बस कर यार, पेट्रोल-डिझेल शंभर पार-मोदी बस करा जनतेची लूटमार’ असे फलक होते. लातूर येथे झालेल्या या आंदोलनात अशोक गोविंदपूरकर, नगरसेवक सपना किसने, माजी महापौर प्रा. स्मिता खानापुरे, केशरबाई महापुरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, दगडू मिटकरी, पप्पू देशमुख, संजय ओव्हळ, रणधीर सुरवसे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोरोना काळामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ करून सर्वसामान्यांना मोदी सरकारने अडचणीत आणले आहे. कोरोनामुळे आधीच अनेक तरुणांचे रोजगार गेले आहेत. अशास्थितीत केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली आहे. सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. या दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाकडून निदर्शने करण्यात आली.
निलंगा येथे झालेल्या आंदोलनात जिल्हा नियोजन समिती सदस्य अभय साळुंके, काँग्रेसचे शहराध्यक्ष गोविंद शिंगाडे, माजी सभापती असगर अन्सारी, सुधाकर दाजी पाटील, महेश देशमुख, माधवराव पाटील, तुराब बागवान, आदींनी सहभाग घेतला.
लातूर रोडवरील जाऊ पेट्रोल पंप येथे अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या आंदोलनात दयानंद चोपणे, कदम, लाला पटेल, सिराज देशमुख, महेश चिक्राळे, सुरेंद्र धुमाळ, दिलीप हुलसुरे, बालाजी मुगळे, अमोल सोनकांबळे, बालाजी भुरे, प्रसाद झरकर, आदी सहभागी झाले होते.