लातूर : थकीत कर्जदार शेतकऱ्यांना सवलत आणि त्वरित नव्या कर्ज योजनेचा लाभ मिळू शकतो. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्रने केले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयीकृत बँकेच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी आकर्षक कर्जमुक्ती आणि नवकर्ज उपलब्ध योजना जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात साकोळ येथील कार्यक्रमात उपसरव्यवस्थापक व्यंकट नारायण यांनी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल, असे जाहीर केले होते. शिवाय, ही योजना ३० सप्टेंबर ही असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बँकेचे महाप्रबंधकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कर्ज वाटप आणि ठेवींमध्ये इतर सरकारी बँकांपेक्षा महाराष्ट्र बँक अग्रस्थानी आहे. २०२१-२२ च्या एप्रिल ते जून कालावधीत १ लाख १० हजार ५९२ लाख कोटी रुपयांच्या एकूण ॲडव्हान्समध्ये बँक ऑफ महाराष्ट्रने १४.४६ टक्के वाढ नोंदविली आहे.
चालू बचत खाते २२ टक्क्यांनी वाढले असून, जे की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वाधिक आहे. जून २०२१ अखेर बँक ऑफ महाराष्ट्रचा एकूण व्यवसाय १४.१७ टक्क्यांनी वाढून तो २ लाख ८५ हजार कोटी रुपये झाला आहे. पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा दुप्पट वाढून २०८ कोटी रुपये झाला आहे. जो एक वर्षापूर्वीच्या याच काळात १०१ कोटी होता. शिवाय, एनपीए ६.३५ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. जे की याच काळात १०.९३ टक्के होते. विशेष म्हणजे निव्वळ एनपीए ४.१० टक्क्यांवरून २.२२ टक्क्यांवर आला असल्याचेही मुख्य महाप्रबंधक म्हणाले.