विकाराबाद ते परळी वैजनाथ २६७ किलाे मीटर अंतराच्या लोहमार्गावरील विद्युतीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आले आहे. यामधील पहिला टप्पा विकाराबाद ते कोहिर डेक्कन ४९.२५ कि.मी.चे पहिले ट्रायल रण (प्रारंभ परीक्षण) कंत्राटदार यांच्याकडून शनिवारी झाले, तर रेल्वे प्रशासन ट्रायल सीआरएस चाचणी सोमवारी होणार आहे.
दुसरा टप्पा कोहिर ते खानापूर आणि तिसरा टप्पा खानापूर ते परळी असा राहणार आहे. तिसऱ्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि लातूर रोड ही दोन मोठी रेल्वेस्थानके जोडली जाणार आहेत. सदर कामही प्रगतिपथावर आहे. असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. सद्य:स्थितीत विकाराबादच्या पुढील रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झालेले आहे. बीदर रेल्वेस्थानकापर्यंत सिव्हिल वर्क पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरणामुळे रेल्वे विकासाचा आणखी एक टप्पा पूर्ण होणार असल्याची माहिती, उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली. या वर्षअखेर उदगीर रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक इंजिन धावेल असे चित्र दिसून येत आहे.