गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचा परिणाम रबीच्या पिकावर दिसून येत आहे. बदलत्या वातावरणाने अळी आणि किडीचा प्रादुर्भाव होत आहे. यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी किटकनाशकांची फवारणी करीत आहेत. रबीचे एकूण प्रस्तावीत २ लाख २७ हजार ९५१ हेक्टर क्षेत्र होते. मात्र तब्बल ३ लाख २० हजार ६२ हेक्टर क्षेत्रावर यंदा रबीचा पेरा झाला आहे. त्यापैकी २ लाख ४८ हजार ५१७ हेक्टरवर हरभरा हे पीक घेण्यात आले आहे. त्यापाठोपाठ ११ हजार ९८९ हेक्टरवर गहू, ज्वारी ३ हजार २९१ हेक्टर, करडईचा पेरा ४ हजार ८७६ हेक्टरवर घेण्यात आला आहे. सर्वाधिक कमी रबी ज्वारीचे क्षेत्र असून केवळ १५९ हेक्टरवर असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. जिल्ह्यात कापसाची लागवड अल्प आहे. त्यापाठोपाठ उसाचे पीकही घेतले जाते. खरिपात सोयाबीन आणि रबीत हरभरा पिकाला शेतकरी प्राधान्य देत आहेत.
ढगाळ वातावरणाने होईल किडीचा प्रादुर्भाव
रबीच्या हंगामात पाऊस झाला तर फारसा परिणाम होणार नाही. मात्र ढगाळ वातावरणामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढेल. त्यासाठी हरभरा, गहू, ज्वारी, करडई या पिकांवरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी फवारणीही केली पाहिजे.
रबीच्या हंगामात अशी घ्यावी पिकांची काळजी
सध्या ढगाळ वातावरण असल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे बुरशी नाशकाची फवारणी आवश्यक आहे. कीड रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शिवाय, शेतकऱ्यांनीही पिकांची काळजी घेण्याची गरज आहे.
फवारणी आवश्यक
ढगाळ वातावरणाचा हरभरा, गहू, ज्वारी, करडई पिकावर परिणाम होणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी किटकनाशकांची फवारणी करण्याची गरज आहे.
- दत्तात्रय गावसाने,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी