लातूर : पक्षीमित्र महेबूब चाचा यांच्या पत्नी मेहरूनिस्सा महेबूब सय्यद (५५) यांचे गुरुवारी अल्पश: आजाराने निधन झाले. ही बातमी सायंकाळी कळल्यानंतर सदैव पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेले अनेक घरटेही गहिवरून गेले.
पक्षीमित्र महेबूब चाचा यांच्यासोबत मुक्या जीवांच्या सेवेत राहणाऱ्या मेहरूनिस्सा यांनीही सदैव पक्षी आणि प्राण्यांना कुटुंबातील सदस्य मानले. शहरातील विविध भागांतून शाळकरी मुले, अनेक कुटुंब खास पक्ष्यांचा किलबिलाट पाहायला जात असत. कोरोनाकाळामुळे सगळेच आपापल्या घरी होते. त्याही परिस्थितीत महेबूब चाचा, त्यांच्या पत्नी मेहरुनिस्सा आणि मुले मुक्या जिवांच्या दिमतीला राहत असत. चाचांचे कुटुंब सर्वांनाच परिचित होते. कोणाकडूनही मदतीची अपेक्षा न करता धडपड करणाऱ्या चाचांना मेहरूनिस्सा यांची अखेरपर्यंत खंबीर साथ राहिली.
प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून शहरातील अनेक कार्यकर्ते पशू-पक्ष्यांच्या मदतीचा विषय आला की, महेबूब चाचांच्या परिवाराकडे धाव घेत. मेहरूनिस्सा यांच्या पश्चात पती महेबूब चाचा, तीन मुले, एक मुलगी, सासू, सासरे असा मोठा परिवार आहे.