लातूर शहरातील पाच, उदगीरमधील दाेन आणि औशातील एका ठाण्याला पाेलीस कर्मचाऱ्याची अधिक पसंती आहे. जे कर्मचारी लातूर शहरात गत दहा ते पंधरा वर्षांपासून ठाण मांडून बसले आहेत, अशांनी लातूरलगतच्या तालुक्यांना प्राधान्यक्रम दिला आहे. यामध्ये औसा, रेणापूर, मुरुड, चाकूर या ठाण्यांचा समावेश आहे. लातूर पाेलीस दलात एकूण अधिकारी संख्या १५१, कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ८५९ आहे. त्याशिवाय, पाेलीस दलाच्या मदतीला ९५० हाेमगार्डसची संख्या आहे. अनेकांची साेयीच्या, लातूरलगतच्या पाेलीस ठाण्यांसाठी फिल्डिंग सुरू असल्याची चर्चा पाेलीस दलात रंगली आहे.
या तीन ठाण्यांना अधिक पसंती...
गांधी चाैक ठाणे : लातूर शहरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्यात नियुक्ती मिळावी, यासाठी अनेकांचा प्राधान्यक्रम आहे. मुलांच्या शिक्षणाची साेय हाेईल, या हेतूने अनेकांनी शहरातील चारपैकी तीन पाेलीस ठाण्यांना पसंती क्रमांक दिला आहे़.
शिवाजीनगर ठाणे : लातूर शहरातील या ठाण्यालाही अनेकांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा सध्याला पाेलीस दलात आहे. हे ठाणे कर्मचाऱ्यांसाठी साेयीचे आहे. लातूरमध्ये वास्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी कर्मचाऱ्यांनी आपला पसंतीक्रम नमूद केला आहे.
एमआयडीसी ठाणे : लातुरातील या ठाण्याला विशेष महत्त्व आहे. उदगीरनंतर लातुरात येण्यासाठी अनेक कर्मचारी उत्सुक आहेत. तर काही कर्मचारी दहा-दहा वर्षांपासून पाेलीस अधीक्षक कार्यालयात ‘या कार्यालयातून त्या कार्यालयात’ बदलून कर्तव्य बजावणाऱ्यांना लातूर साेडणे गैरसाेयीचे वाटत असल्याचे चित्र आहे.
या ठाण्यात नकाे रे बाबा...
गातेगाव : लातूर शहरापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर असलेल्या गातेगाव पाेलीस ठाण्यात फारसे काेणी जाण्यासाठी उत्सुक नसते. अनेक कर्मचाऱ्यांकडून शहराबराेबर शिक्षणाची साेय हाेईल, अशा भागातील ठाण्याला प्राधान्य दिले जाते. यातून ड-दर्जाच्या पाेलीस ठाण्यांबाबत पाेलीस कर्मचारी फारसे उत्सुक नसतात.
वाढवणा (बु़.) : उदगीर तालुक्यातील वाढवणा पाेलीस ठाण्याबाबत फारसी पसंती कर्मचाऱ्यांतून दाखविली जात नाही. जिल्ह्याच्या मुख्यालयापासून हे ठाणे ७० किलाेमीटर अंतरावर आहे. अडवळणाचे ठाणे म्हणून याबाबत अनेक कर्मचाऱ्यांत उत्सुकता नसते.
भादा : औसा तालुक्यात भादा हे गाव आडवळणाचे असून, या ठाण्याला कर्मचाऱ्यांचा फारसा प्रतिसाद नसताे. या ठाण्याची हद्द लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सीमा भागातील आहे. याला पर्याय म्हणून मुरुड ठाण्याला कर्मचाऱ्यांतून पसंती दिली जात आहे.