लातूर : मांजरा परिवारातील साखर कारखान्यांची वाटचाल उद्दिष्टपूर्ती करणारी असून, ती पुढेही कायम राहणार आहे. परिवारातील साखर कारखान्यांनी गाळप ऊसाला एफआरपीपेक्षा अधिकचा भाव दिला असून, आगामी काळातही ही परंपरा कायम राहणार आहे. त्यामुळे लोकप्रियतेसाठी पत्रकबाजी करणाऱ्या मंडळींच्या स्टंटबाजीकडे शेतकरी सभासदांनी दुर्लक्ष करावे, असे प्रतिपादन लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी केले.
लोकनेते विलासराव देशमुख यांनी मांजरा कारखान्याची उभारणी करुन साखर कारखानदारी यशस्वी करुन दाखवली. मांजरा परिवाराचा विलास युनिट १, युनिट २, रेणा, जागृती असा विस्तार झाला असून, या सर्वच साखर कारखान्यांनी विक्रम मोडीत काढत नावलौकिक मिळवला आहे. परिवारातील साखर कारखान्यांनी नेहमीच सभासदांच्या ऊसाला एफआरपीपेक्षा अधिक भाव देण्याची परंपरा चालवली आहे. केवळ ऊसाला भाव देऊन न थांबता ऊस विकास, कामगार, कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजना तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासचे प्रकल्पही कारखान्यांच्यावतीने राबविण्यात येत आहेत. मात्र, आमदार रमेश कराड यांनी मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस बिल द्यावे, म्हणून आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. मांजरा परिवाराकडून एफआरपीपेक्षाही अधिकचा भाव मिळणार आहे, हे त्यांनाही माहिती आहे. मात्र, आंदोलन केले म्हणून तो मिळाला हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असून, आमदार कराड यांनी केवळ मांजरा परिवारावरच न बोलता रेणापूरजवळील पन्नगेश्वर, बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकमंगल या कारखान्यांच्या बाबतीतही पत्रकबाजी करुन त्या कारखान्यांच्या सभासदांवरील अन्याय दूर करणे आवश्यक असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी पत्रकात म्हटले आहे.