काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. काही नियमांमध्ये बदल करुन अधिक कडक केले आहेत. दरम्यान, शहरातील गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शहरात रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, आता सोमवारपासून शहरात ज्या व्यापाऱ्यांची दुकाने आहेत, त्या दुकानातील व्यापाऱ्यांनी व त्यांच्या नोकरांनी कोरोनाची चाचणी करून घेणे अत्यावश्यक आहे. जर कोणी कोरोनाची चाचणी करुन घेतली असेल व सदरील तपासणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तर तो अहवाल दुकानातील दर्शनी भागात लावावा. नगरपालिकेचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी अथवा अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाचे कर्मचारी तपासणीसाठी आले असता त्यांना सदरील अहवाल दाखवावा. जर असा अहवाल प्रशासनातील अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्याला आढळून न आल्यास अशा दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सर्वांनी नियमांचे पालन करावे...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तो रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी शहरातील व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले आहे.