पाण्याच्या कारणावरून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
लातूर : तू मोटार लावल्यामुळे माझ्या घराकडे पाणी येत नाही म्हणून शिवीगाळ करून फिर्यादीला लाकडाने डोक्यात तसेच डाव्या हाताच्या दंडावर, उजव्या हाताच्या मनगटावर, पाठीवर मारून जखमी केल्याची घटना रेणापूर तालुक्यातील मोरवड येथे घडली. याबाबत अनंत अनुरथ जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लिंबराज ज्ञानोबा जोगदंड व अन्य एकाविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल जाधव करत आहेत.
शेतातील बांधकामाच्या कारणावरून मारहाण
लातूर : शेतातील बांधकामाच्या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना जळकोट तालुक्यातील डोमगाव येथे घडली. याबाबत भगवान व्यंकटराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाधर किशन पवार व अन्य एकाविरुद्ध जळकोट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटावर कत्तीने मारून जखमी केले तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून गंगाधर पवार व अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; नागरिकांची गैरसोय
लातूर : शहरातील सुभेदार रामजी नगर भागात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. शिवाय, पावसामुळे अनेक सिमेंट रस्ते उखडले आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी येत नाही तसेच नालेसफाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीमध्ये आणखीन भर पडली आहे. रस्ते दुरुस्ती, नालेसफाई आणि दररोज घंटागाडी कचरा संकलनासाठी यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.