जिल्ह्यात एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र व २४२ उपकेंद्र आहेत. आरोग्य केंद्रासाठी एमबीबीएस पदवी असलेल्या डॉक्टरांची १०१ पदे मंजूर असून त्यातील केवळ ९० पदे भरली आहेत. उर्वरित रिक्त ११ पैकी ९ ठिकाणी ११ महिन्यांच्या कंत्राटी पध्दतीने डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात किमान दोन डॉक्टरांच्या जागा आहेत. परंतु, जळकोट तालुक्यातील अतनूर आणि निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील आरोग्य केंद्रात केवळ एकच डॉक्टर आरोग्यसेवा देत आहेत. त्यामुळे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर ताण वाढल्याचे दिसून येत आहे. लामजना, नळेगाव, चापोली, मदनसुरी ही गावे मुख्य रस्त्यावर असल्याने तेथील रुग्णांची नोंदणी ही दररोज २२५ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे तिथे तीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी १८९ बीएएमएस डॉक्टर...
जिल्ह्यात २४२ उपकेंद्र आहेत. यातील बहुतांश उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनीत रूपांतर करण्यात आले आहे. तिथे बीएएमएस पदवी असलेल्या डॉक्टरांची २०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी १८९ पदे भरली आहेत. उर्वरित पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा...
जिल्ह्यातील अतनूर व कासार बालकुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एकच वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे काही प्रमाणात त्यांच्यावर ताण पडत आहे. तेथील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. लवकरच ती भरली जातील.
- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी.