लोकमत न्यूज नेटवर्क
चाकूर : चाकूर पोलीस ठाण्यांतर्गत चाकूरसह अहमदपूर, रेणापूर तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. या ठाण्यांतर्गत एकूण १०५ गावे असून, त्यासाठी केवळ ५४ पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्त आहेत. त्यामुळे गुन्हेगारी, अवैध धंद्यांवर अंकुश ठेवताना पोलिसांची कसरत होत आहे. येथील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे ठरत आहे.
चाकूर पोलीस ठाण्याची निर्मिती १९३०मध्ये झाली आहे. त्याकाळी लोकसंख्या नगण्य होती. तेव्हा १२ सहाय्यक पोलीस निरीक्षक, हवालदार तर २४ पोलीस नाईक आणि ३६ पोलीस कॉन्स्टेबल पदे होती. तेव्हा चाकूर हे गाव अहमदपूर तालुक्यात होते, तर जिल्हा बीदर होता. कालांतराने लोकसंख्या वाढली आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत गेली.
सध्या चाकूर हे तालुक्याचे ठिकाण असून, येथे एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३ पोलीस उपनिरीक्षक, २ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, १३ पोलीस हवालदार, १८ पोलीस नाईक, १४ पोलीस कॉन्स्टेबल आणि ५ महिला पोलीस कर्मचारी आहेत. पोलीस ठाण्यासाठी दोन जीप आहेत. त्यासाठी चार पोलीस चालक आहेत तर एकूण अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या ५२ आहे.
वायरलेससाठी ३, ठाणे अंमलदार ३, सीसी टेनिस ४, कोर्ट ड्युटी २, कोर्ट सुरक्षा २, उपकोषागार २, हजेरी मेजर १, गोपनीय शाखेत २, वाॅरंट बजावणे २, बारनिशी २, क्राईम लेखणी २, उपविभागीय पोलीस कार्यालयात ३, समन्स बजावणे ३, नळेगाव आऊटपोस्टला ६ असा ३४ कर्मचाऱ्यांवर कायमचा कामाचा भार आहे. या पोलीस ठाण्यांतर्गत नळेगाव येथे आऊटपोस्ट आहे. त्यात चाकूर, चापोली, रोहिणा, घरणी, वडवळ (नागनाथ), कारेपूर, झरी (बु.), बोथी, नळेगाव, शिवणखेड (बु.) अशा दहा बीटमध्ये गावांची विभागणी आहे. या १० बीटला दहा पोलीस हेडकाॅन्स्टेबल आहेत. त्यांना मदतनीस म्हणून पोलीस कर्मचारी देण्यात आले आहेत.