अहमदपूर : शहरातील पोलीस ठाण्याची व कर्मचाऱ्यांसाठीच्या वसाहतीतील इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यात पोलीस वसाहतीत भिंतींना उंदीर, घुशींनी पोखरल्याने त्या पोकळ झाल्या आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जीव मुठीत धरुन रहावे लागत आहे. तसेच पोलीस ठाण्यात अत्यंत कमी जागा असल्याने एकाच खोलीत सहा कर्मचाऱ्यांना आपले कामकाज करावे लागत आहे.
अहमदपूर पोलीस ठाण्याची इमारत जुनी असून ती १९३२ मध्ये बांधण्यात आली आहे. ही इमारत चांगली असली तरी जुन्या काळी बांधण्यात आल्याने सहा खोल्यातून ठाण्याचा कारभार होत असे. त्यातील समोरच्या दोन खोल्या आरोपींसाठी, एक अधिकारी कक्ष, एक हजेरी, अस्थापना, एक गुन्हे अस्थापना तर एकाच खोलीमध्ये सहा उप निरीक्षकांना बसून कारभार पाहावा लागत आहे. त्यातच मुद्देमालासाठी असलेल्या बाहेरच्या कक्षाला गळती लागली आहे. त्यामुळे तिथे मुद्देमाल भिजून सडत आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असलेल्या वसाहतीत ३४ घरे आहेत. त्यातील अर्ध्याहून अधिक इमारती गळक्या आहेत. दारे, खिडक्या मोडल्या आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणात घुशी, उंदीर लागले आहेत. घुशी, उंदरांनी या इमारती पोखरल्या आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, बहुतांश कर्मचारी नाईलाजास्तव बाहेरच्या ठिकाणी भाड्याने राहत आहेत. त्याचा परिणाम कामावर होत आहे. पोलीस वसाहतीचे काम करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
नवीन वसाहतीस मंजुरी...
अहमदपूर शहरातील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन वसाहतीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्याठिकाणी दोन पोलीस निरीक्षकांची घरे, ४८ कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असणार आहेत. एकूण १८ कोटींचे अंदाजपत्रक मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहे, असे उपविभागीय अभियंता प्रकाश मोरे यांनी सांगितले.
नवीन बांधकाम गरजेचे...
जुन्या वसाहतीचे बांधकाम ३० वर्षांपूर्वी झाले असून ती जीर्ण झाली आहे. पावसाळ्यातही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नवीन वसाहत होणे गरजेचे आहे, असे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी सांगितले.
अधिकारी भाड्याच्या घरात...
पोलीस निरीक्षक वगळता वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी बाहेर भाड्याच्या घरात राहत आहेत. मात्र ३२ कर्मचारी अजूनही जीर्ण झालेल्या घरांमध्ये राहत आहेत. त्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. वसाहतीत सुविधा नाहीत. पाणी ४० दिवसांतून एकदा येते. ६ महिन्यांपासून नालेसफाई झाली नाही. पक्का रस्ताही नाही.