लातूर : चुलीवर स्वयंपाक केल्याने धुरामुळे महिलांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक घरी मोफत गॅस देण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसचे वितरण केले जात आहे. मात्र, गॅस संपल्यानंतर नवीन सिलेंडर घेण्यासाठी ८६० रुपये मोजावे लागत असल्याने उज्ज्वला योजना पुन्हा चुलीवर आली असून, कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार असा सवाल लाभार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे व्यवहार कोलमडले तर अनेकांच्या हातचे काम गेले आहे. त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालविताना कसरत करावी लागत आहे. २०१९ मध्ये ७१९ रुपयांवर असणारा गॅस आता ८६० रुपयांवर पोहचला आहे. सोबतच पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. दरम्यान, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस कनेेक्शन देण्यात आले. मात्र, सोबत मिळालेले सिलेंडर संपल्यावर नवीन सिलेंडरसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी आपला मोर्चा पुन्हा चुलीकडे फिरविला आहे.
गॅस सिलेंडरचे दर ...
जानेवारी २०१९ - ७१९
जानेवारी २०२० - ८००
जानेवारी २०२१ - ८३५
ऑगस्ट २०२१ - ८६०
जिल्ह्यात शुक्रवारी गॅसचा दर - ८६०.५० पैसे
सिलेंडर भरणे कसे परवडणार...
कोरोनामुळे हाताला काम मिळत नाही. त्यातच मोफत गॅस कनेक्शन मिळाल्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र, आता सिलेंडर संपल्यावर भरण्यासाठी ८६० रुपये मोजावे लागतात. एकतर हाताला काम नाही मग गॅस भरणार कसा हा प्रश्न आहे. - जिजाबाई चिलकरवार
मोफत कनेक्शन मिळाले मात्र, सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे घरगाडा चालविणेही जिकरीचे झाले आहे. कोरोनामुळे काम मिळणेही सोपे राहिलेले नाही. त्यामुळे गॅस बंद करुन चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे. - प्रीती पवार
पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. गॅस भरण्यासाठी ८६० रुपये मोजावे लागत आहेत. शासनाने महागाई कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याची गरज आहे. - उमा पौळ