कृषी विभागाच्या वतीने पथकांची नियुक्ती
लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. खते, बी-बियाणांवर नियंत्रण राहावे, यासाठी कृषी विभागाच्या वतीने तालुकानिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांकडे शेतकऱ्यांनाही तक्रार करता येणार आहे. जिल्ह्यात मागील वर्षी सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार या बाबींना आळा घालण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने पथके नियुक्त करण्यात आली असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
गुळ मार्केट परिसरात रस्त्यावर पाणी
लातूर : शहरातील गुळ मार्केट परिसरात शुक्रवारी सकाळी गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. ऐन सिग्नलवरील रस्त्यावर गटारीचे पाणी वाहत होते. शहर महापालिकेच्या वतीने सदरील घटनेकडे तात्काळ लक्ष देण्यात आले. दरम्यान, दिवसभर दुर्गंधीचा सामना स्थानिक नागरिकांना करावा लागला. वारंवार अशा घटना होणार नाहीत, याकडे महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
शाळांच्या वतीने मार्गदर्शन कार्यशाळा
लातूर : कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आहेत. त्यातच पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, या विषयावर शाळांच्या वतीने मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या जात आहेत. तसेच ऑनलाईन तासिकांच्या माध्यमातून पुढील वर्गाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात अभ्यास करून घेतला जात आहे. दरम्यान, या उपक्रमाचे पालकांमधूनही कौतुक होत आहे.
दयानंद फार्मसीच्या वतीने सॅनिटायझरचे वाटप
लातूर : शहरातील दयानंद फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस ठाण्यात पोलिसांसाठी सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी साडेतीनशे सॅनिटायझर बाॅटल वितरित करण्यात आल्या. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे, ललितकुमार शहा, रमेश राठी, रमेश बियाणी, सुरेश जैन, संजय बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यशस्वितेसाठी प्राचार्या डाॅ. क्रांती सातपुते, विभाग प्रमुख प्रा. राहुल वाघमारे, प्रा. प्रकाश शिवनेचारी, ग्रंथपाल आशिष वारे आदींसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी आदी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना सॅनिटायझरच्या बाॅटल देण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग होता.