लातूर : ओबीसी समाजाच्या हक्काचे आरक्षण परत मिळावे, या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात भाजपच्यावतीने विविध ठिकाणी शनिवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. लातूर, औसा, निलंगा, उदगीर, येरोळमोड, देवणी, अहमदपूर, चाकूर येथे तालुकास्तरावर आंदोलन झाले.
भाजपचे नेते माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल चार तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध जातीतील ओबीसी समाजबांधव पारंपारिक वेषभूषा आणि वाद्यवृंदासह सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरुच राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली ॲप्रोच रोड येथे आंदोलन करण्यात आले. उदगीर येथे माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार गाेविंद केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन झाले. तसेच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ मोड, देवणी, चाकूर येथे चक्काजाम आंदोलन करून मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील -निलंगेकर म्हणाले, मराठा आणि ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नसल्याने रद्द झाले. या दोन्ही समाजाला आरक्षण मिळावे, ही भाजपची भूमिका आहे. जोपर्यंत हे हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत भाजपचा हा संघर्ष सुरुच राहील.