देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात परिवर्तन होऊन भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नव्याने सुरू केली. या योजनेत ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होऊ लागली. रेणापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था होती. या रस्त्यांबाबत भाजप नेते रमेश कराड यांनी पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे रेणापूर तालुक्यातील सात रस्त्यांच्या कामांना तब्बल ३३ कोटी ९७ लाख रुपयांच्या खर्चाची व ४२.८१ कि.मी. लांबीच्या रस्ते कामांना मंजुरी मिळाली. पानगाव-सारोळा-माकेगाव १० कोटी ५६ लाख, पानगाव-मुसळेवाडी-फावडेवाडी ६ कोटी ३ लाख, लहानेवाडी रस्ता १ कोटी ६४ लाख, दिवेगाव रस्ता १ कोटी ७६ लाख, चाकूरवाडी रस्ता ७२ लाख, रामवाडी (ख.) सुकणी कोष्टगाव जिल्हा सरहद्द रस्ता ७ कोटी २० लाख, वसंतनगर-हाके तांडा रस्ता ६ कोटी ८ लाख याप्रमाणे सात रस्त्यांसाठी ३३ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी आमदार नसताना रमेश कराड यांनी खेचून आणला. मात्र त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांकडून होत असल्याचा आरोप भाजपचे लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे व तालुकाध्यक्ष ॲड. दशरथ भिसे यांनी केला आहे. आमदारांनी आपल्या आमदारकीच्या काळात कोणत्या रस्त्यांना मंजुरी मिळवून आणली आणि नवीन काय केले ते सांगावे, जुन्या कामाचे श्रेय लाटू नये, असेही भाजपाचे विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे व रेणापूर तालुकाध्यक्ष ॲड. दशरथ भिसे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
रेणापूर तालुक्यातील सात रस्त्यांच्या कामांसाठी ३४ कोटींचा निधी भाजप काळात मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST