कोरोनाच्या संकटामुळे शासनाने सन २०२१- २२ वर्षासाठी कृषी योजनांच्या लाभासाठी ऑनलाइन प्रस्ताव स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सन २०२०- २१ मध्ये ऑनलाइन प्रस्ताव सादर केला आहे; परंतु त्यांची कोणत्याही याेजनेसाठी निवड झाली नाही, ते शेतकरी आपल्या अर्जातील बाबीमध्ये बदल करू शकतील. अशा प्रकारचे अर्ज सन २०२१-२२ साठी ग्राह्य धरण्यात येतील. त्यासाठी पुन्हा कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. सन २०२१-२२ साठी वरील अर्जातील ज्या बाबींकरिता अर्ज केलेला नाही, त्या बाबींचा अर्जामध्ये विनाशुल्क समावेश करण्यात येईल.
महाडीबीटीवर शेतकरी योजना सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व याेजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचा त्रास होणार दूर...
नव्या आदेशामुळे शेतकऱ्यांच्या पैसा व वेळेची बचत होणार आहे. शेतकरी स्वत:चा मोबाइल, संगणक, लॅपटॉप, सीएससी सेंटर, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्रातून ऑनलाइन अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदरील संकेत स्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्यांच्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन नोंदणी करून घ्यावी.
- सुभाष चोेले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.