लातूर : क्षुल्लक कारणावरून एकाने लाकडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथे घडली. याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात रविवारी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळकोट तालुक्यातील पाटोदा येथील अभिजित मच्छेवाड व त्यांचा भाऊ हे वाढवणा पाटी येथील ढाब्यावर जेवण करीत होते. तेव्हा आरोपी प्रमोद बांगे (रा. वाढवणा खु.) तिथे येऊन बसले. तेव्हा मच्छेवाड यांनी आम्ही दोघे भाऊ जेवण करीत आहोत, असे म्हटले असता तुझा काय संबंध, तू मला शिवीगाळ करतो, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तिथे जवळ असलेले लाकूड हातात घेऊन पाठीत, कपाळावर, हातावर व उजव्या डोळ्यावर मारून जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मच्छेवाड यांच्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना येमले करीत आहेत.