लातूर : विनाकारण एकमेकांना जोरजोराने शिव्या का देता, असे विचारल्याने आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना राजीव नगर येथे घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विकास अभिमन्यू चौरे यांनी आरोपींना ‘विनाकारण एकमेकाला जोराने शिव्या का देता. इथे आमचे घर आहे. बाया, मुुले आहेत’ असे म्हटले असता, आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दगड डोक्यात मारून जखमी केले. यावेळी भांडण सोडविण्यास आलेल्या फिर्यादीच्या भाच्याला गुडघ्यावर दगडाने मुका मार दिला. तुझ्या घरात घुसून घरच्यांना पण मार देईन, अशी धमकी दिल्याचे विकास चौरे यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सुमित नामदेव खुडे व अन्य तिघांविरुद्ध (सर्व रा. राजीव नगर, लातूर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकाॅन्स्टेबल कोकणे करत आहेत.
ऑटोतील प्रवाशांच्या कारणावरून मारहाण
लातूर : ऑटोतील प्रवाशांच्या कारणावरून फिर्यादी व फिर्यादीच्या पुतण्याला लाथाबुक्क्यानी, दगडाने मारहाण केल्याची घटना राजीव नगर येथे घडली. याबाबत चौघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑटोतील प्रवाशांच्या कारणावरून राजीव नगर येथे फिर्यादी अंकुश कोंडिबा खुडे यांना शिवीगाळ करण्यात आली. लाथाबुक्क्याने मारून मुका मार दिला. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असल्याचे पाहून ‘तू आमच्याविरोधात पोलीस ठाण्यात केस केलीस तर बघतो’ म्हणून धमकी दिली. हातातील काठीने मारून जखमी केले, असे अंकुश खुडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात विकास चौरे व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकाॅन्स्टेबल कोकणे करत आहेत.
दुचाकीची धडक; पाय फॅक्चर
लातूर : भरधाव वेगात निष्काळजीपणे वाहन चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना बाभळगाव नाका ते म्हाडा कॉलनी येथे घडली. याबाबत प्रकाश वैजनाथ कांबळे (रा. बौद्ध नगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (एमएच १२ एसएस ९५३०)च्या दुचाकीस्वाराविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जहागीरदार करत आहेत.