उन्हाळी सोयाबीन तंत्रज्ञान अवगत करावे
लातूर : जिल्ह्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. घरच्या घरी दर्जेदार बीजोत्पादन निर्मिती व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रज्ञान अवगत करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी गावस्तरावर विशेष मोहीम राबविली जात असून, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या होम आयसोलेशनमध्ये १८३ रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य विभाग आणि मनपाच्या वतीने चाचण्यांवर अधिक भर दिला जात आहे. दररोज साधारणत: दीड हजार चाचण्या केल्या जात आहेत, तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी केली जात आहे.
एसटी मालवाहतूक सेवेला प्रतिसाद
लातूर : जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी मालवाहतूक सेवा राबविली जात आहे. लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर या पाच आगारांतून मालवाहतूक गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यातून लातूर विभागाला चांगले उत्पन्न मिळत आहे. उद्योग, व्यावसायिकांच्या मागणीनुसार मालवाहतूक गाड्या वाढविल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सरचिटणीसपदी कुलकर्णी
लातूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडियाच्या प्रदेश सरचिटणीसपदी हरिराम कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आ.धीरज देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, ॲड.किरण जाधव आदींनी कौतुक केले आहे.
घंटागाडीची मागणी
लातूर : शहरातील प्रकाशनगर, खाडगाव रोड, कपिलनगर आदी भागांत नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. परिणामी, रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.