लातूर : यंदा मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या ४ लाख ६९ हजार ७४६ हेक्टरवर पेरण्या झाल्या. पिकेही चांगली उगवली. परंतु, वरुणराजाने उघडीप दिल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणची पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. ते शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पीक जगविण्यासाठी धडपड करीत आहेत.
हवामान खात्याने यंदा वेळेवर पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. दरम्यान, मृग नक्षत्र निघाले आणि दमदार पाऊस झाला. त्यामुळे आगामी काळात चांगला पाऊस होईल, या आशेने शेतकऱ्यांनी महागडे बी- बियाणे, खते खरेदी करुन खरीप पेरण्यांना सुरुवात केली. जिल्ह्यात खरीपाचा सरासरी ६ लाख १२ हजार ४२१ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ६९ हजार ७४६ हेक्टरवर पेरा झाला आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे उगवलेली पिके कोमेजू लागली आहेत. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
सोयाबीनचा पेरा वाढला...
जिल्ह्यात यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. कारण यंदाच्या उन्हाळ्यात सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला होता. हमीभावापेक्षा दुप्पटीच्या जवळपास भाव पोहोचला होता. त्यामुळे आगामी काळातही असाच चांगला दर मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भर दिला असल्याचे पहावयास मिळत आहे.