तालुक्यात १६५ कृषी निविष्ठा असून खरीपाच्या तोंडावर काही ठिकाणी ज्यादा दराने खत, बियाणे विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शहरातील कृषी सेवा केंद्र असोसिएशनच्या वतीने सर्व प्रकारचे खत व सोयाबीनच्या बियाणांच्या अधिकृत किंमतीचे फलक मुख्य दाेन चौकात लावण्यात आले आहेत.
त्याचे अनावरण तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, प्रभारी तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार, कृषी सेवा केंद्र असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकट मुसळे यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांनी एमआरपीनुसार बी- बियाणे, खते खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी, तहसीलदारांकडे कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी सचिन बजाज, विनोद भुतडा, शिवाजी वाढवणकर, श्यामसुंदर भुतडा, पवन सोनी, निलेश कलमे, प्रमोद शिंदे, उमाकांत काडवाडे, वैभव मुरकुटे, पिंटू कदम, अविनाश गोरटे आदी उपस्थित होते.
युरियाची टंचाई...
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असून त्यासाठी युरियाची मागणी वाढली आहे. मात्र सध्या युरियाची टंचाई झाली असल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांनी सांगितले. दरम्यान, महाबीज बियाणे कमी उपलब्ध झाल्याने तालुक्यातील चार डीलरकडील साठा संपुष्टात आला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.