ट्रकची कारला पाठीमागून जोराची धडक
लातूर : भरधाव वेगातील एका ट्रकने लातूर ते औसा जाणाऱ्या रोडवर बुधोड्यानजिक (एमएच २४ एएस १४४९) या क्रमांकाच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातात कारचे ४० हजारांचे नुकसान झाल्याची घटना घडली. याबाबत अतिश कांतिलाल कुचेरिया (रा. हत्तेनगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (सीजी ०४ एलए ८०४३) या क्रमांकाच्या ट्रकचालकाविरुद्ध औसा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोहेकॉ. कांबळे करीत आहेत.
सामाईक बांधावरील झाडाचे फाटे तोडल्याने मारहाण
लातूर : शेतातील सामाईक बांधावरील बाभळीचे फाटे तोडल्याचा राग मनात धरून फिर्यादी व फिर्यादीच्या वडील, भाऊ व मुलाला काठीने, दगडाने, विटाने आणि लोखंडी पाईपने डोक्यात, पायावर मारून जखमी केल्याची घटना भंडारवाडी शिवारात घडली. लाथा-बुक्क्याने मारहाणही केली. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली, असे अंगद सूर्यकांत गुणाले यांनी रेणापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार बाबूराव तुळशीराम गुणाले व अन्य चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. हंगरगे करीत आहेत.
अपार्टमेंटमध्ये पार्किंग केलेली दुचाकी चोरीला
लातूर : अंबाजोगाई रोडवरील हाक्रिसेंट अपार्टमेंटमध्ये पार्किंग केलेल्या (एमएच २४ एक्स ६३०१) या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत सय्यद सल्लाउद्दीन शफियोद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. देशमुख करीत आहेत.
उपमुख्य लेखाधिकाऱ्यांचा सत्कार
लातूर : जिल्हा परिषदेतील उपमुख्य लेखाधिकारी सविता जंपावाड यांनी सात वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविल्याबद्दल अल्पसंख्याक संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिनेशकुमार जाधव, नवनाथ चव्हाण, श्रद्धा लोखंडे यांची उपस्थिती होती.