उदगीर : तालुक्यात जूनच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. सध्या होत असलेली आवक ही परजिल्ह्यातील आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दररोजच्या वापरातील तूर व चणाडाळीची मागणी वाढत आहे. ठोक बाजारात खाद्यतेलाच्या किमती थोड्या कमी झाल्या असल्या तरी किरकोळ बाजारात फारसा फरक पडलेला नाही.
तालुक्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांचा भाजीपाला उत्पादनाकडे कल वाढला आहे. मागील वर्षी तालुक्यात समाधानकारक पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे बोअर, विहिरीला बऱ्यापैकी पाणी होते. त्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उन्हाळ्यातही उत्पादन घेतले होते. कुमठा, लोहारा, बामणी, देवर्जन, माळेवाडीसह अन्य गावांतील शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात.
दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस पडल्यामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालेभाज्यांची पाने खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी ती बांधावरच टाकून दिली आहेत. त्यामुळे शहरात भाजीपाला लातूर व सोलापूर जिल्ह्यांतून येत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्चही जास्त येत असल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे.
वांगे ८० रुपये प्रति किलो...
पालक, शेपू १० रुपये जुडी, मेथी, कोथिंबीर २५ रुपये जुडी तसेच टोमॅटो ३० रुपये, वांगी ८० रुपये, हिरवी मिरची ६० रुपये किलो, दोडके, कारले, शिमला मिरची, भेंडी प्रत्येकी ८० रुपये प्रति किलो दराने ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.
लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर शहर व ग्रामीण भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हॉटेल, खानावळी, धाबे सुरु झाले आहेत. त्यामुळे तूरडाळ व चणाडाळीला मागणी वाढली आहे. डाळीसोबतच खाद्यतेलाच्या दरातही मोठी वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. सध्या खाद्यतेलाच्या ठोक दरात अल्पशी घट झाली असली, तरी किरकोळ बाजारात त्याचा परिणाम दिसून येत नाही.